औरंगाबाद- एका विवाह
समारंभाच्या निमित्ताने केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी आज शहरात दाखल होत
आहेत. या दौऱ्यात आज दुपारी ते विभागीय आयुक्तालयात विकास कामासंदर्भात आढावा बैठक
घेणार आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या मूडमध्ये असलेल्या प्रशासनाला गडकरींच्या
दौऱ्याने कामाला लावले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या थर्टी फर्स्टचा प्लॅन पाण्यात
गेला आहे.
नववर्ष
स्वागताच्या तयारीत असलेल्या अधिकाऱ्यांना हा दौरा म्हणजे अडचण ठरत आहे. केंद्रीय
मंत्री नितिन गडकरी यांचे औरंगाबाद शहराशी विशेष नाते आहे. अनेक कुटुंबांशी
त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याचबरोबर शहरातील अनेक धार्मिक कार्यक्रमातही
ते नेहमी हजर असतात. वर्षभरातून किमान तीन ते चार वेळा खाजगी दौऱ्याच्या
निमित्ताने गडकरी कुटुंबासह शहरात दाखल होत असतात. या निमित्ताने अनेकदा बैठकांचे सत्र ही घेतात.
अशाच एका विवाहानिमित्त नितीन गडकरी आज शहरात दाखल होत आहेत. उद्या सकाळी विवाह
समारंभ असल्याने आज दुपारी गडकरी विभागीय आयुक्तालयात विकास कामासंबंधी आढावा बैठक
घेणार आहेत. या बैठकीला मराठवाड्यातील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित
राहण्याचे फर्मान सोडले आहे. विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी
या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 31 डिसेंबर च्या दरम्यान या बैठकीचे आयोजन झाल्याने अनेकांची अडचण झाली
आहे. नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी गेल्या महिनाभरापासून जय्यत तयारी
केली होती. अनेकांनी विदेश दौऱ्याचे नियोजन केले होते तर काहींनी कुटुंबासह
पर्यटनस्थळांना भेट देण्याची तयारी केली होती. मात्र गडकरींच्या दौऱ्याची सूचना
येऊन धडकली आणि अनेकांच्या नियोजनावर पाणी फेरले गेले.
















